Monday 9 December 2013

सुरुवात...

“अन्या तू इतका बोलतोस पचर पचर, त्यापेक्षा काहीतरी लिहायला सुरुवात कर”


हे शब्द गेल्या १० वर्षात काही निवडक पण जवळच्या बर्याच लोकांनी उच्चारले परंतु खरे कोरले गेले ते माझे २ दुर्गयार बंधू गणेश मारणे – पाटील आणि गुरुबंधू भूषण शिंदे – देशमुख यांनी उच्चारले तेव्हा ! (वय २५ वर्षे आहे पण पहिली ५ वर्षे तर धड बोलता येत नव्हता आणि नंतर येत होता पण ते लिहिण्या च्या लायकीचे नव्हते). त्यातूनच काही शब्द उमटले, ते असे...

प्रसंग नेहमी सारखाच. सूर्य उजाडायला अजून काही मिनिटे बाकी होती, आमची दुर्गायारी सवारी आमची लाडकी फोर्ड फिगो (एम एच ११ ए डब्ल्यू ७७७३) गंगा भाग्योदय च्या दारासमोर वेळेत आलेली, गाडीत बसलेली मूर्ती आणि तिची कीर्ती पाहता गाडी तशी लहानच (परंतु महाराजांनी तो मला दिलेला आशीर्वादाच आहे कारण ती नसती तर कदाचित आज ३५ असलेला किल्ल्यांचा आकडा कुठे तरी १० च्या आसपास घुटमळत राहिला असता वर्षानुवर्षे). उंची सुमारे ६ फुट (शरीराने ! कर्तुत्वाने मी तरी अजून मोजू शकलेलो / शकणार नाही अशी), दणकट शरीरयष्टी, मोठे पंजे, एखाद्या माची सारखे विस्तृत कपाळ, त्यावर आणि कंठावर अष्टगंध चा टिक्का, पायात नुकताच घेतलेला “Quechua”, अंगात स्वेटर, कार्गो आणि चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन समोर दिसतो तो आमचा सर्वांचा गुरुबंधू दुर्गधुरंधर हाडाचा शिवभक्त (आणि !!! एक Instrumentation Engineer आणि पुण्यातील एका कंपनीचा सी.ई.ओ.कारण काही विशिष्ठ जमातीतील प्राण्यांना शिवभक्त म्हटले कि अशिक्षित बेरोजगार रिकामा असाच गैरसमज आहे, ते सत्य नाही) भूषण शिंदे – देशमुख, आमच्या साठी फक्त दादा.

रिती आणि ख्याती नुसार मी पाठीवर Bag मध्ये ट्रेक साठी लागणारे सामान - डबा, एका हातात स्वेटर आणि दुसर्या हातात शूज घेऊन अनवाणी च धावत पळत गाडी जवळ आलो (शूज हातात कारण झोप हे माझे पहिले प्रेम आणि तिच्या मिठीतून सुटायला तसा मला जास्तच वेळ लागतो, त्याचे हे परिणाम). फिक्का पडला तर पैसे परत असा माझा वर्ण, अंधारात ओळखूच येत नाही बरेचदा. वाचणाऱ्या काही लोकांमधली लोक मला फोन करून बोलतीलच रात्रीच सगळे जागेवर काढून ठेवा असे बोलल्यावर तोंड वर करून “सकाळी करीन” असे सांगणाऱ्याच असेच होत. मिळेल ती शोर्ट आणि मिळेल तो T Shirt, सोक्स साठी पळापळ, रुमालासाठी शोधाशोध, मोबाईल, पाकीट – पैसे सगळच अस्थाव्यस्थ. असा वेन्धळेपणा या भूतलावर अगदी काडीमात्र गल्लत न करता जर कोणी करू शकेल तर तो मी आणि फक्त मीच, अनिकेत सुरेश कुंजीर, काहींसाठी अंड्या, काहींसाठी अन्या तर काहींसाठी काळ्या, नुकतेच दादाने ठेवलेलं माझे नवीन नाव कालिया-ए-हिंद.

एक मेकाला “गुड मोर्निंग” बोलत आम्ही निघालो.

प्रथेप्रमाणे गाडीत प्लेयर वर “पंडितजी” विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत “माझे माहेर पंढरी”, “इंद्रायणी काठी”, “ज्ञानियांचा राजा” आम्हाला ऐकवत होते. यादीत पुढे ओळखीचे झालेले भीमराव पांचाळे “अंदाज आरशाचा वाटे खरा असावा”, पु.ल., संदीप खरे, लतादीदी, किशोरदा, पंचमदा, हीमेश, विशाल-शेखर, आपलेच असलेले अजय – अतुल, Shaggy, Hotel California असे अनेक जण   काही सुरेल, काही नाक दाबून तर काही घसा खरडून काढत आमच्या साठी गाणार होते. 

पुढे चांदणी चौकाजवळ येऊन गाडी थांबली आणि समोर आले ते – आदल्या दिवशी खास सलून मध्ये जाऊन एका नवीन पद्धतीने कोरलेली दाढी आणि टोकदार मिशी, डोक्यावर जुन्या हिंदी सिनेमा मधल्या खलनायकाला शोभेल अशी ती विशिष्ट प्रकारची टोपी, अंगात स्वेटर, जीन्स (शोर्ट Bag मध्ये असते बर का), गळ्यात राजमुद्रा, एका मनगटाला फास्टट्रेक आणि दुसर्या मनगटात रुद्रक्ष्याची माळ, मधल्या बोटात नीलम आणि तोंडातून निघणारा पहिला शब्द “मुजरा दादा” असे आमचे गणेश मारणे – पाटील, आमच्या साठी फक्त गण्या. 

आता देशमुख, कुंजीर, पाटील सगळे आले आणि सुरु झाला तो आणखी एका गडाच्या दिशेने प्रवास. गाडीवर बसला कि दादा जणू वैमानिकच होतो आणि एक्स्प्रेस वे कधी संपतो ते गाडीलाही कळत नाही. अर्थात यंदा एक्स्प्रेस वे नव्हता. गाडी जाणार होती ती पाटलांच्या तालुक्यातून - “मुळशी”. पिरंगुट, घोटावडे, पौड करीत मुळशी जलाशयाला अर्ध प्रदक्षिणा मारीत आम्ही पोहोचलो आमचे मित्र, मुक्या प्राण्यांचे संरक्षक सन्मानीय श्री. स्वप्नील चोपडे (रा. रोहा) यांच्या आवडत्या “Hotel Quick Bite” मध्ये. तुपातली साबुदाणा खिचडी, उपमा आणि बोर्नविटा  असा सुंदर असा नाष्टा झाला. बिल आल्यावर ते देतादेता दादाने चोपडे ना उद्देशून गौरवार्थी उद्गार हि काढले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. पुढे होता तो म्हणजे कापूस भासणारे ढग पांघरलेला हिरवागार “ताम्हिणी”. वरच्या बाजूचे वर्णन जितके मखमली वाटते त्याच्या अगदीच विरुद्ध अशी खाली असणाऱ्या रस्त्याची दशा ! (स्त्रीलिंगी असता तर अवदसाच !) संपूर्ण मसाज मिळाली, अगदी तरतरीतच.

दरम्यान हॉटेल मधून निघताना दादाच्या बाजूची पुढची जागा पाटलांनी घेतली होती. एकही कणाचा फरक न करता नेहमीची बसायची पद्धत – उजवा हात मांडीवर, मान ताठ, डाव्या हाताचा कोपरा खिडकीवर टेकवलेला आणि अंगठा आणि पहिल्या बोटाने आधीच पिळदार असलेल्या मिशीला पिळणे हे फक्त आणि फक्त पाटीलच करू शकतात किंवा त्यांनीच करावे !

डोंगरवाडी गेल्यावर वीळा-भागड एम.आय.डी.सी. मार्गे खाली उतरत आम्ही निजामपुराची वाट धरली. आमचे लक्ष्य होत “उम्बरडी”. एम.आय.डी.सी. पासून पुढे ६.५ कि.मी. अंतरावर डावीकडे एक फाटा लागतो, कडपे-जिते-उम्बरडी रस्ता. कडपे ते उम्बरडी हे अंतर सुमारे १३ कि.मी. आहे.


नेहमी प्रमाणेच “उम्बरडी” हे गाव सुद्धा शहराच्या असह्य गोंगाटापासून अत्यंत दूर, मोजकीच घरं, शेंबडी पोरं, वाटेत शेणाचे गोळे, गोठ्याचा वास आणि येणाऱ्या गाडीकडे कुतूहलाने पाहणारी काही म्हातारी मंडळी. आम्हाला या चित्राची जणू सवयच झालीये आता. गाडी मधून उतरताच तिघांनीही आळस देत स्वच्छ आणि निर्मळ हवेचा मोठ्ठा श्वास घेतला आणि गाडीतली आचारसंहिता सोडत तोच श्वास दुप्पट तीव्रतेने दुसरीकडून सोडला (हे ज्यांना कळाले त्या १० पैकी ८ पुरुष असतील यात शंका नाही !!). समोरच्याच घरात राहणाऱ्या काकांशी बोलून गाडी लावायला चांगली जागा शोधली, bag, कॅमेरा, टोप्या घेतल्या. काकांकडून पाणी भरून घेतलं. आत्ता पर्यंत केलेल्या सगळ्या भटकंतीत आलेला एक समान अनुभव म्हणजे, पुण्यात लोकांकडे सगळे काही आहे, राहायला घरं, फिरायला गाड्या, खायला हॉटेल आणि उडवायला पैसा या सर्व गोष्टी कदाचित या गावातल्या लोकांकडे नसतील / नव्हत्या, तरीही हीच लोकं श्रीमंत – त्यांच्या मोठ्या मनामुळे. एकीकडे पेठेत पत्ता विचारला तर व्हस्कून अंगावर येणारे ती गोरी चामडी आणि दुसरीकडे किल्ल्याची वाट विचारताच अनवाणी पायांनी, दुप्पट उत्साहाने अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी आणून सोडणारी हि मातीत वाढलेली काळी काया... काकांनी अगदी किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेशी आणून सोडलं. वाऱ्यावर डोलणारं शेत म्हणजे नक्की काय याचे प्रात्यक्षिक आम्हाला निसर्गाने आज दाखवायचे ठरवले होतं. सुसाट वारा, ढगाळ वातावरण... वाह !


वाट सापडताच काका माघारी फिरले, आम्ही आमची वाट चालू लागलो आणि त्रिकुटाच्या गप्पांचा पिटारा उघडला.

नेहमीप्रमाणे चढायला सुरुवात करताच दादाने किल्ल्याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. तीच मी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो (दादा चूकभूल माफ करावी आणि दुरुस्तही करावी _/\_). “किल्ले कुर्डूगड” (किल्ले विश्रामगड) दिसायला उंचीने तसा कमीच वरच्या टोकाला निमुळता, आजू बाजूच्या थोड्या उंच असलेल्या डोंगरात लपलेला. याची बांधणी अंदाजे ११ व्या शतकात “शिलाहार” राज घराण्याच्या कालावधीत झाल्याचे आढळते. या किल्ल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे रायगड या स्वराज्याच्या राजधानी भोवती महाराजांनी २४ मावले उभे केले होते त्यातलाच हा एक ! रायगडा कडे येणाऱ्या सर्व वाटांवर नजर ठेवणे हे या मावळ्यांचे काम, तेच हा कुर्डूगड हि करायचा.


 महाराज आणि अश्या बर्याच थोरांनी सांगून ठेवलय समोरच्याला कमी लेखू नका. पण तरीही ती गल्लत आम्ही तिघांनीही केली, “किल्ला छोटाच आहे होईल तासाभरात”. जेमतेम ५ ते १० मिनिट चाललो नाहीतर कोकण आपली जादू दाखवायला लागले (तशी कोकणाने माझ्या वर आयुष्य भराची जादू केलीये ते वेगळच ;) ). तिघेही घामाने डबडबून गेलो, धाप लागलेली, बोलता येईना, हृदयाचे ठोके डोक्यात जाणवायला लागले ! असे होण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव...

“बरेच दिवसांनी ट्रेक ला आलोय ना, त्यामुळे...” अशी एकमेकची समजूत काढत पढे सरकलो. पण त्रास काही कमी होईना, तेव्हा पुन्हा एकदा खाली बसलो आणि मग खर काय ते कळाले. कोकणाचे दमट हवामान, पाणी कमी पिण्याच्या सवयी आणि त्यावर चढाई आणि तिचाही यंदा कोन बाकी किल्ल्यांच्या तुलनेत बर्याच प्रमाणात अगदी सरळ. उपाय म्हणून काहीतरी खायला घेतला, ट्रेक ला येताना “कुत्र्याची” बिस्किटे आणू नयेत (मारी बिस्कीट) असा कडक नियम आहे आमच्यात, खास माज म्हणून बोर्बन !!!

धापा टाकत टाकत तू पुढे मी मागे – मी पुढे तू मागे असे करत करत आम्ही चढत राहिलो. एकही सपाट टेप नसलेलं हे असे पूर्ण कपाळाकडे पाहत चढण, जीव गेला. सुमारे १ ते १.५ तास चालल्या नंतर घामाने चिंब भिजलेल्या अवस्थेत आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. टेहळणी हे मुख्य काम असल्याने कुर्डूगडाला म्हणावी तशी काही मानवी बांधणी-तटबंदी नाही. वर पोहोचताच एक छोटंसं वाडी-वजा गाव आहे, “कुर्डूपेठ”. हातावर मोजता येतील इतकीच कौलारू घरं, मळकट कपडे असले तरी सतत हसतमुख लोकं अशी हि कुर्डूपेठ

पेठे जवळच चौकोनी आकाराचे एक सुंदर असे कुर्डाई देवीचं मंदिर. निव्वळ योगायोग कि काही जादू पण कधीही असे ठरवून मंदिरात न जाणारे आही तिघे त्यादिवशी मंदिरात होतो, यात विशेष असं कि तो दिवस म्हणजे नवरात्रीची ७ वी माळ. मंदिर अश्या ठिकाणी असले तरीसुद्धा पूजे मध्ये काहीही कमतरता नव्हती. पिवळ्या रान फुलांच्या ७ माळा देवीला वहिल्या होत्या अतिशय प्रसन्न वास्तू... सुख !!!






कुर्डाई मंदिर

हि वास्तू म्हणजे फक्त कुर्डाई चे मंदिरच नव्हती तर ती होती कुर्डूपेठेची इ. १लि ते ५वि ची शाळा. एकच शिक्षक दररोज कुर्डूगड चढून या पोरांना शिकवायला यायचे, ५ इयत्ता, एकच वर्ग, एकच शिक्षक, बसायला चटई आणि फळा म्हणजे भिंत... धन्य ते शिक्षक आणि कौतुक त्या पोरांचे.  रविवार असल्याने शाळेला सुट्टी, तरीही ३ पोरं तिथेच खेळत होती. एकाचे नाव राम, दुसरा लहू आणि तिसऱ्याच नाव आठवत नाही. आम्ही पटापट डबे काढले, एकाकडे पराठे, एकाकडे भाजी-चपाती आणि सारिका वहिनींनी दिलेले मसाले डोसे !!! फडश्या पाडला आम्ही काही वेळातच. डोसा काय असतो असा गहन प्रश्न त्या पोरांच्या चेहऱ्या वर उमटला जेव्हा दादाने त्यांना हि १ डोसा वाढला


१५ मी. एक डुलकी घेऊन किल्ला पाहायला निघालो, तीनही पोरं आमच्या पुढे पुढे किल्ला दाखवीत आणि गप्पा हाणत. किल्ल्याच्या मध्य भागी एक उंच असा सुळका आहे. त्यावर हि जाऊ शकतो पण रॉक क्लाम्बिंग करावे लागेल. किल्ल्यावर एक महादेवाचे मंदिर आहे, एक हनुमानाची भव्य मूर्ती आहे. सुळक्याच्या अर्ध्या पर्यंत सहज जाते येतं, दगडी पायऱ्या आणि भग्न प्रवेशद्वार पाहून आपण आताल्याबाजुला येतो. तिथून सुळक्याला अखंड प्रदक्षिणा मार्ग होता पण हल्लीच काही दरडी कोसळून ती वाट अर्ध्यात संपते. हि अर्ध प्रदक्षिणा संपवून आम्ही खाली उतरू लागलो.


          कुर्डूपेठेतून दिसणारा सुळका |  भग्न प्रवेशद्वार

मंदिरात पुन्हा आलो तेव्हा एकमेकाकडे पाहून आम्ही हसत हसत म्हणालो जरा थोडी आणखी झोप काढूयात का ? हाहाहाहाहा !!! आणि लगेचच आडवे झालो डोळा उघडला तोपर्यंत पाउण तास होऊन गेला होता. दादाने माझ्या पृष्ठ भागावर एक जोरदार लाथ हाणत मला जाग केलं आणि आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. 


किल्ला उतरताना काही नवीन गोष्टी शिकलेलो आणि त्यावरून कहीतरी नवीन करायचे ठरले (ते काय हे पुढच्या काही आठवणींमध्ये कळेलच तुम्हाला)

उम्बरडीत येऊन गाडी चालू केली आणि सुसाट निघालो पुण्याच्या दिशेने. जेवण घरी हा निश्चय झाला होता. संध्याकाळचे अंदाजे ५ वाजले असावेत, चहाची तल्लप झालेली. एम.आय.डी.सी. असल्याने जास्त हॉटेल, टपरी दिसल्या नाहीत. पण एक बोर्ड होता ज्याने भरपूर खेळवलं.

“हॉटेल जानकी”... पाटीवर दाखवलेले बाण पाहत आम्ही गाडी वळवत होतो आणि चहा मिळणार चला मिळणार असे उडत होतो. शेवटी आम्हाला जानकी चे गेट दिसलं ! गाडी पार्किंग मध्ये लावली आणि तिघेही एकाच वेळेस खाली उतरलो आणि एकाच वेळी हॉटेल च्या बोर्ड कडे नजर गेली – “हॉटेल जानकी – रेस्टोरंट & बार”... मनात बरीच राजकीय हालचाल झाली, चहाची सत्ता गेली आणि .....

प्रथेप्रमाणे मी मागच्या सीट वर आडवा झालो दादा आणि गण्या गप्पा मारत राहिले, मी अधून मधून काहीतरी बडबड करायचो आणि पुन्हा लुडकायचो... (यावर दादाच्या मी असंख्य शिव्या खाल्ल्या असतील आजवर !!!)

चांदणी चौक कधी आला हे मलातरी कळाले नाही, गण्या उतरला. दादाने मला घरी सोडला आणि तो पुढे घरी पोहोचला...

अत्यंत सुंदर असा एक दिवस – एक ट्रेक – एक प्रवास - अनंत आठवणी !

मी मनातला कल्लोळ शब्दात मांडायचा केलेला हा पहिलाच प्रयत्न... काहींना आवडेल काहींना बोर होईल. ज्यांना आवडेल त्यांचे आभार आणि ज्यांना बोर होईल त्यांची माफी

पुढेही लिहित राहीनच... बघू...

दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत 
अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी महाराजाधिराज 
!! श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!


5 comments:

  1. masta lihila ahe.. awadlay! suru rahude ata!

    ReplyDelete
  2. Ek number re, I loved it.. Superb.... Asa vatala me pan mazya gadanchya sankhyet 1 ni vadh karavi. Kurdugad la jaun aalo asa vatala na mhanun :)

    ReplyDelete
  3. farach chaan!! durgayatrecha anubhav eka veglya paddhattini vachayla maja ali...!!

    ReplyDelete